… तर राज्यातील एकही प्रकल्प रखडणार नाही !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मिळून एक ‘पण’ केला आहे की, राज्यातील एकही प्रकल्प रखडणार नाही आणि रखडलेल्या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये २०१९ पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात ॲग्री बिझनेसवर एकही रुपया खर्च झाला नाही, हे रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांच्या बाबतीत जागतिक बॅकेने दिलेले पैसे खर्च करण्यात आलेले नाहीत. हे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही याचीही ग्वाही जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सांगली आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. हे पूराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येईल का, याविषयी चर्चा झाली आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेनेसुद्धा सहमती दर्शवली आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आले आहेत. जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वळवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी (७ जुलै) मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली तसेच नातू रुद्रांश आणि परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Share