अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; परळीत आंदोलन

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरून सध्या वाद पेटला आहे. आ. मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी आज शुक्रवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे हिंदूधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढून पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.

परळी वैजनाथ शहरातील विठ्ठल मंदिर येथून मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ब्राह्मण समाजासह हिंदूधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू असे, आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले. मात्र, जोपर्यंत अधिकृतपणे एफ.आय.आर. नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलिस ठाण्यातून हलणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांनी परळी येथील पोलिस ठाण्यात ठिय्या धरला आहे.

दरम्यान, काल गुरुवारी ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना घेरावही घालण्यात आला. याच प्रकरणात आता अमोल मिटकरी यांच्यावर अकोला, नाशिकपाठोपाठ पुण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share