चित्रपट दिग्दर्शक टी. रामा राव यांचे निधन

चेन्नई : ‘अंधा कानून’, ‘नाचे मयूरी’, ‘एक ही भूल’, ‘आखरी रास्ता’, ‘मुझे इंसाफ चाहिए’ यासारख्या सुपरहिट हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक टी. रामाराव (तातिनेनी रामाराव) यांचे बुधवारी (२० एप्रिल) पहाटे चेन्नई येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. रामा राव यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून टी. रामा राव आजारी होते. त्यामुळे त्यांना चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (२० एप्रिल) संध्याकाळी चेन्नई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी तातिनेनी जयश्री, मुले चामुंडेश्वरी, नागा सुशीला, अजय आणि इतर कुटुंबीय आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये प्रयोगशील चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून टी. रामा राव यांची ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. सोबतच त्यांनी तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. टी. रामा राव यांनी १९६६ ते २००० या कालावधीत अनेक हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी १९५० च्या अखेरीस त्यांचे चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. जया प्रदा यांच्यासोबत १९७७ मध्ये त्यांनी दिग्दर्शक केलेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘यमगोला’ त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याशिवाय ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचानी कपूरम’ हे त्यांचे गाजलेले तेलुगू चित्रपट आहेत. त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये नवरात्री, ब्रह्मचारी, इल्लालू, पंडंती जीवनम, अंधा कानून, नाचे मयुरी, मुकाबला इत्यादींचा समावेश आहे. तेलुगूसोबतच हिंदीमध्येही त्यांनी ‘अंधा कानून’, ‘एक ही भूल’, ‘मुझे इंसाफ चाहिए’. ‘आखरी रास्ता’, ‘नाचे मयूरी’ ‘संसार’, यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. बिगबी अमिताभ बच्चन, श्रीदेवी, एन. टी. आर. आणि ए. एन. आर. पर्यंत भारतातील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी चित्रपट केले आहेत. अमिताभ बच्चन, श्रीदेवी, अनुपम खेर यांच्यासोबत त्यांनी ‘आखरी रास्ता’ हा हिंदी चित्रपट केला, तर नृत्यांगना व अभिनेत्री सुधा चंद्रन यांना घेऊन ‘नाचे मयूरी’ या बायोपिकची निर्मिती केली. दिग्दर्शनासोबतच त्यांनी ‘श्री लक्ष्मी प्रॉडक्शन’ या बॅनरखाली तामिळ चित्रपटांची निर्मितीही केली. धिल, यूथ, अरुण, समथिंग समथिंग उनाकुम इनाकुम आणि मलाइकोटाई हे त्यांचे तामिळ चित्रपट बरेच गाजले.

https://twitter.com/AnupamPKher/status/1516614242698334212?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1516614242698334212%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fdirector-t-rama-rao-passes-away-at-the-age-of-84-in-chennai-mrj-95-2895186%2F

अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून टी. रामा राव यांच्या निधनानंतर एक ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी. रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दुःख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचे सौभाग्य लाभले. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!’

Share