भोंग्यामुळे सरकार अलर्ट, पोलीस महासंचालकांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकार आणि गृहखात कामाला लागलं आहे. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नाशिकमध्ये तर भोंग्यांच्या आवाजाचे डेसिबलमध्ये मोजमाप करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या परवानगीसाठी मंगळवारी पोलीसांना निवेदन दिले. आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सभेसाठी मैदान मिळाले असले तरी पोलिसांची परवानगी बाकी आहे. पण मनसे देखील नियोजीत वेळी सभा घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, ठाकरेंच्या सभेला परवानगी देवू नये अशी मागणी शहरातील विविध पक्ष-संघटनांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. राज ठाकरेंच्या एका घोषणेमुळे अख्खे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असताना मनसेने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात काय संघर्ष बघायला मिळेल हे बघणे आता औत्सुक्याचे आहे.

Share