माझं भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा- आव्हाड

मुंबई : देशात सध्या  निवडणूकीचे वार वाहत आहे. यात सर्वच पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. पाच राज्यात उत्तरप्रदेश या राज्याची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष सक्रिय झाला असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक साधीसुधी नाही. ह्या निवडणूका देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफिल राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार, तेच तुमचं भविष्य असणार आहे. तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपाला  संपवून टाका, असं आवाहन करतानाचे माझे हे भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते मुंब्रामध्ये विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

“माझ्यावर बुलंदशहर मधील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपा विरोधात प्रचार करणार आहे. पण काही जण भाजपाची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मत कोणाला दिले पाहिजे, हे तुम्ही ठरवा. भावनेच्या आधारे राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पडणार. पण जिंकणार कोण? तर ते जिंकतील. पण नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार?,” असं ते त्यांच्या सभेला उपस्थित उत्तर भारतीय लोकांना म्हणाले.

उत्तर प्रदेशची निवडणूक ही लोकसभा निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावते. त्या अनुषंगाने बोलताना आव्हाड म्हणाले, “या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे. देशात काय होणार? काय नाही? हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. २०२४ मध्ये सत्तेत कोण बसणार, ते ही निवडणूक ठरवते. त्यामुळे कुणाला मतदान करायचे हे मी सांगणार नाही. परंतु भाजपा हरवले पाहिजे, हे महत्वाचं आहे, असं आव्हाड यांनी सांगितलं.

Share