पुणे : पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ सुरूच असून, ७ मे रोजी झालेल्या ५० रुपयांच्या दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत गुरुवारी पुन्हा साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरही आठ रुपयांनी महागला आहे. या महिन्यातील सिलिंडर दरवाढीची ही दुसरी वेळ असून, सिलिंडरची किंमत एक हजार पार गेली आहे.
महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आधीच हैराण झाले आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबत स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. खाद्यतेल, गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, भाजीपाला यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता स्वयंपाकघरात दररोज लागणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याआधी २२ मार्च आणि ७ मे रोजी सिलिंडरच्या किमतीत प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई तसेच दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ही हजार रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, तर नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलिंडर १००७, तर व्यावसायिक सिलिंडर २३७४ रुपयांवर पोहोचले आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात नुकतीच १ मे रोजी १०२ रुपयांची वाढ झाली होती. त्यापाठोपाठ ७ मे रोजी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती. या वाढीसह १४.२ किलोचे घरगुती गॅस सिलिंडर प्रथमच एक हजार रुपयांच्या पुढे जाऊन १००३.५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता ते १००७ रुपयांवर गेले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर २३६६ रुपयांवर होते, ते आता २३७४ रुपयांना मिळणार आहे. इंधन दरवाढीमुळे पोळलेल्या नागरिकांना आता गॅस दरवाढीचा फटका बसत आहे.
मागील वर्षी एप्रिलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर ८१३ रुपयांना होते. त्यात वर्षभरात १९३ रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढ सुरूच राहिली, तर खर्चाचा भारही आणखी वाढणार आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदानही बंद केले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत पडणारे सिलिंडर आता दुप्पट किमतीत विकत घ्यावे लागत आहे. संपूर्ण देशात महागाईचा चांगलाच भडका उडालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काहीही उपाययोजना करीत नसल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.
घरगुती सिलिंडरचे सात महिन्यांत वाढलेले दर
(महिना – सिलिंडर दर – वाढ (रुपयांत)
- १९ मे २०२२ – १००७ – ३.५०
- ७ मे २०२२ – १००३.५० – ५०
- एप्रिल २०२२ – ९५३ – ५०
- मार्च २०२२- ९०३-१५
- सप्टेंबर २०२१- ८८८- २५
- ऑगस्ट २०२१ – ८६३- २५
- जुलै २०२१ – ८३८- २५.५०