लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील तीव्र उतारावर गॅस टॅंकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे जाणाऱ्या दोन कारवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई-पुणे मार्गावर जाऊन उलटला. या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा भीषण अपघात झाला.
सदर अपघातग्रस्त गॅस टॅंकर व दोन्ही कार या पुण्याहून मुंबईकडे जात होत्या. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाहीत. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी व खोपोली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. अपघातग्रस्त दोन्ही कार बाजूला करण्यात आल्या असून, गॅस टॅंकरला सुरक्षितरित्या बाजूला करण्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त टॅंकर बाजूला केला जाईल.