माझ्या हातात ‘ईडी’ द्या, मग एकेकाला बघतोच!

सातारा : ‘ईडी’ म्हणजे चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बिडी मिळते ना तशी त्या ‘ईडी’ची अवस्था झाली आहे. माझ्या हातात ‘ईडी’ द्या, मग एकेकाला बघतोच, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
सातारा पाटबंधारे विभाग आणि सातारा नगरपालिका यांच्या प्रयत्नातून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.

ते म्हणाले, राज्यातील वातावरण कुणी बिघडवलंय याचा विचार केला पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर मजा येते. कोण जेलमध्ये जाऊन आला, तर कोण जेलमध्ये आहे. लोकांना सर्व समजतं. तरीही हे एकमेकांची पाठ थोपटून घेत आहेत. एकेकाला दांडक्याने सडकून काढले पाहिजे. या लोकांनी पैसे खाल्ले आहेत. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ हा माझा टीव्हीवरील आवडता शो आहे. सध्या हे चॅनेलसुध्दा पाहणे मी बंद केले असून, सध्या सुरू असलेले माकड चाळेच बघत असतो. मजा येते. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय..बेसलेस.. कोण म्हणतं हा मुख्यमंत्री आहे का, तो मुख्यमंत्री आहे का, चांगलं आहे. काय बोलणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेबाबत ते म्हणाले, कोल्हापूरला उत्कृष्ट सभा झाली. भरपूर लोक सभेला आले होते. वादच नाही. तुमची डिलीव्हरी दिली? झिरो..काहीच नाही. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मग या लोकांना दाखवतो.

खा. उदयनराजे म्हणाले, एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत असताना या लोकांना दिसत नाहीत का? तरीही एकमेकांची पाठ थोपटायची? त्यांनी काही केलं नाही; पण दोन वर्षे जेलमध्ये होते. यांनीही काही केलं नाही; पण सध्या ते जेलमध्ये आहेत. कोण आहेत, कशाकरिता आत आहेत? लोकांना डोळे आहेत, कान आहेत. जनतेला सगळं समजतं. लोक हसतात. काय बोलणार? निवडणुका लागल्या तर हे लोक कसे काय उभे राहणार? मी कुणाच्या नादी लागत नाही. माझं नाव कुणी घ्यायचंही नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Share