वेळेवर नाश्ता न दिल्‍याने सुनेवर गोळीबार

ठाणे : वेळेवर नाश्ता न दिल्‍याने रागाच्या भरात सासऱ्याने सुनेची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ठाण्यातील राबोडी परिसरात घडली. सीमा राजेंद्र पाटील (वय ४२ वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे तर काशीनाथ पाटील (वय ७६ वर्षे) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी राबोडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर काशीनाथ पाटील फरार झाले असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

ठाण्यातील राबोडी परिसरात काशीनाथ पाटील हे पत्नी, दोन मुले, दोन सुना व नातवंडे अशा आपल्‍या परिवारासह राहतात. वाळू व्यवसायिक असलेले काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा यांच्यात गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही या कारणावरून किरकोळ वाद झाला. वेळेत नाश्ता देतो तरीदेखील तुम्ही बाहेर जाऊन सुनांची बदनामी करता, असे सीमाने सासऱ्यास उलट उत्तर दिले. याचा राग आल्याने काशीनाथ पाटील याने आपल्या पिस्तूलातून सुनेवर गोळीबार केला. या घटनेत सीमा पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज (शुक्रवार) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली तिचा रितसर परवाना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी काशीनाथ पाटीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share