सत्तेसाठी महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी; शरद पवार यांचा आरोप

जळगाव : राज्यात गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून, आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्ता मिळवण्याच्या उद्देशानेच महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये छापेमारी केली जात आहे. अपेक्षाभंग झाल्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

आज शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकार व भाजपवर टीकास्त्र सोडले. ज्यांच्या हातात देशपातळीवर सत्ता आहे त्यांना काहीही करून राज्यांमध्येही सत्ता हवी होती; पण त्यांना लोकांनी सत्ता दिली नाही. राज्यात आपले सरकार सत्तेवर येईल, अशी अपेक्षा भाजपला होती; पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे ‘ईडी’ सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ‘ईडी’च्या धाडी पडत आहेत, असा टोला पवार यांनी लगावला. सध्या देशात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या दोन राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे. राज्य ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न असून, मूलभूत अधिकारांवर गंडातर आणण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला.

राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जाताहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आता बदलली असून, राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जाताहेत, असे दिसत आहे; पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये, अशी चिंता व्यक्त करून महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे, असे पवार म्हणाले. जेम्स लेन याच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहिलेले पत्र मनसेने समोर आणले होते व शरद पवारांवर टीका केली होती. पवार यांनी पुरंदरेंच्या या पत्रावर उत्तर दिले. ते म्हणाले, जेम्स लेनच्या पुस्तकांत छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे; पण बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनचे कौतुक केलेले आहे. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक होते, असे पुरंदरे म्हणाले होते.

Share