मुंबई : उष्णतेच्या तडाख्याने हैराण झालेल्या आपणा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे यंदा मान्सून चांगला होणार आहे. यंदाचा पाऊस सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असण्याची शक्यता असून, यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेट या खासगी हवामान एजन्सीने मान्सून २०२२ चा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यावर्षी जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून चांगला असेल. कारण, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८८०.६ मि. मी. आहे. दरवर्षी या आकडेवारीशी तुलना करून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. यंदाचा मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के इतका बरसणार आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मि. मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावर्षी देशभरातील पाऊस सरासरीइतका होणार असला तरीही राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे या मोसमात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या गेल्या दोन ऋतूंवर ला-निनाचा प्रभाव दिसून आला आहे. तत्पूर्वी ला-निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटत असे. मात्र, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती अधिक असल्याने ला-निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला-निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल-निनोची शक्यता नाही.
#Monsoon2022: #Skymet expects the upcoming monsoon to be ‘normal’ to the tune of 98% (with an error margin of +/- 5%) of the long period average of 880.6mm for the 4- month long period from June to September. #MonsoonForecast https://t.co/bDJoK7BkYp
— SkymetWeather (@SkymetWeather) April 12, 2022
असा आहे स्कायमेटचा मान्सूनचा अंदाज…
- यंदाच्या मोसमात जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल.
- राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरासोबत अन्य काही राज्यांमध्ये संपूर्ण हंगामात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- केरळ आणि उत्तर कर्नाटकात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कमी पाऊस पडेल.
- पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.
स्कायमेटच्या मते २०२२ मध्ये कोणत्या महिन्यात कसा पाऊस पडेल?
- जूनमध्ये LPA (Lakhs Per Annum) (१६६.९ मि. मी.) च्या तुलनेत १०७ टक्के पाऊस पडू शकतो.
- जुलैमध्ये LPA (२८५.३ मि. मी.) च्या तुलनेत १०० टक्के पाऊस पडू शकतो.
- ऑगस्टमध्ये LPA (२५८.२ मि. मी.) च्या तुलनेत ९५ टक्के पाऊस पडू शकतो.
- सप्टेंबरमध्ये LPA (१७०.२ मि. मी.) च्या तुलनेत ९० टक्के पाऊस अपेक्षित आहे.