राज्यपाल कोश्यारींना केवळ एखाद्या विधानावरुन कोंडीत पकडू नये – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलं.

चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले की, भाजपाचे १८ कोटी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात. त्यामुळे शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी राज्यपालांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरेंवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट घेतली नसती, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकार पडेल, असे भाकित केले आहे. याविषयी विचारले असता, सरकार मजबूत आहे. ते कार्यकाळ पूर्ण करेल. विरोधी पक्षातील २० ते २५ आमदारांचे या सरकारला छुपे समर्थन आहे. सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले तर, सध्याच्या १६४ पेक्षा खूप जास्त आमदारांचे समर्थन दिसेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेसच्या ५०० सक्रिय आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आगामी २०२४च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षांना उमेदवार तरी मिळतात का पहावे, अशी कोपरखळी बावनकुळे यांनी मारली.

Share