गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी

सातारा : मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सातारा शहर पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ८ एप्रिलला केलेल्या हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केली होती. तेथील गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले होते. ॲड. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर तारळे (ता. पाटण) येथील राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीड वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. आता या प्रकरणात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल मुंबईतून ताब्यात घेतले होते. आज शुक्रवारी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाने ॲड. सदावर्ते यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. बचाव पक्षाच्या वतीने सरकार पक्षाने मांडलेले सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांचा पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर बचाव पक्षाने हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी सदावर्ते यांना सातारा पोलिस ठाण्यातआणल्यानंतर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. या पार्श्वभूमीवरआज न्यायालय परिसरात सातारा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share