उद्धव ठाकरेंचा ‘श्री जी होम्स’ कंपनीशी काय संबंध? किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित बांधकाम प्रकल्पात काळा पैशाचा वापर झाला आहे. श्रीधर पाटणकर हे भागीदार असलेल्या ‘श्री जी होम्स’ या कंपनीत २९ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? ठाकरे परिवाराशी संबंधित असणारा ‘हवाला किंग’ नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठे लपवून ठेवले आहे? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे नवे आरोप केले.

यावेळी सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ‘श्री जी होम्स’ या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. कोमो स्टॉक्स या कंपनीच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला. श्री जी होम्स या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाला, त्यामध्ये दोनवेळा पैसे आले. यापैकी पहिली नोंद ही ५ कोटी ८६ लाख ८० हजार ९०२ रुपयांची आहे. दुसऱ्या वेळेला २३ कोटी ७५ लाख ४८ हजार ८१८ रुपये या कंपनीत वळवण्यात आले, असे सोमय्या यांनी सांगितले.

केंद्रीय तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत. मात्र, तो सापडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदकिशोर चतुर्वेदीचा पत्ता सांगावा, अन्यथा ईडी आणि कंपनी मंत्रालयाने नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार म्हणून घोषित करावे. या नंदकिशोर चतुर्वेदी याने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांना आपल्या १२ बनावट कंपन्यांचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर करून दिला. ठाकरे कुटुंबांचे नंदकिशोर चतुर्वेदीशी व्यावसायिक संबंध आहेत. मी काही दिवसांपूर्वीच नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तीन कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे सादर केले होते. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याविषयी अद्यापपर्यंत एकही शब्द उच्चारलेला नाही, अशी टीका सोमय्या यांनी केली. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्याच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्त्यावर रजिस्टर्ड झालेल्या आहेत. चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून, आदित्य, तेजस ठाकरे यांच्याबरोबर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचाही आरोप करून नंदकिशोर चतुर्वेदीबाबत मुख्यमंत्री ठाकरे गप्प का? असा सवालदेखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रवीण कलमे यांना कोण वाचवत आहे?
माझ्यावर आरोप करणारे प्रवीण कुलमे कुठे आहेत? ते देशातून बाहेर गेले का? कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की, उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असे प्रश्न सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केले. या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी उत्तर द्यावे. प्रवीण कलमे यांना कोण वाचवत आहे? कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत. त्यांचा एफआयआर दाखल झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत. कलमे यांना फरार घोषित केले जावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली.


पुराव्यांनंतर संजय राऊतांना उत्तर देणार
आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्यांवर ‘टाॅयलेट घोटाळा’ केला असल्याचा आरोप केला. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता सोमय्या म्हणाले, संजय राऊतांनी माझ्यावर आरोप केले; पण त्यांनी कागद दाखवला नाही. जेव्हा ते पुरावे दाखवतील तेव्हाच मी त्यांना उत्तर देईन.

Share