मुंबई : देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असून, सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे; परंतु महागाईवर कसलीही चर्चा होत नाही. उलट हनुमान चालिसा आणि भोंग्याच्या आवाजावरून मात्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महागाईवरून लक्ष हटवण्यासाठीच हनुमान चालिसा वाचन केले जात आहे, अशी टीका हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील ‘मातोश्री’ हे निवासस्थान तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन ‘मातोश्री’ समोर येऊन हनुमान चालिसा वाचायची गरजच काय? ती कुठेही वाचावी, असे म्हणत खासदार हेमंत पाटील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीकेची तोफ डागली. हनुमान चालिसा आणि भोंग्याचा मुद्दा पुढे करून राजकारण करणाऱ्या मनसेवरही त्यांनी टीका केली.
अंबरनाथ येथे शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान दौऱ्यात खासदार हेमंत पाटील यांनी राणा दाम्पत्य आणि मनसेला टीकेचे लक्ष्य केले. याप्रसंगी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर स्व.आनंद दिघे, माजी कामगारमंत्री साबीरभाई शेख यांच्या विचारातून अंबरनाथला शिवसेना रुजली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदींच्या प्रयत्नातून अंबरनाथला २५ वर्षांपासून नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असून, यापुढेही ती कायम राहिली पाहिजे, यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात उत्कृष्ट काम करीत आहे. मात्र, सत्तेपासून दुरावलेले विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या कामांविरोधात नागरिकांत गैरसमज निर्माण करत आहेत. शिवसैनिकांनी जागरूक राहून काम करावे. नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू असल्याचे खासदार पाटील म्हणाले.