हनुमान चालिसा आपल्या घरी वाचावी, मुंबईत वाचण्याचा हट्ट कशासाठी?

मुंबई : हनुमान चालिसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी. राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा स्वत:च्या घरी वाचावी. अमरावतीच्या घरी वाचावी किंवा मुंबईतील किंवा दिल्लीतील घरी वाचावी. मुंबईत वाचण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला.

राज्यात मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यावरून सुरू असलेल्या घडामोडींच्या व वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केले. तसेच विरोधकांकडून जाणीवपूर्वक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहे. राज्यात अस्थिरता, कायदा व सुव्यवस्था नसल्याचे भासवले जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे केलेले नुसते प्यादे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी राणा दाम्पत्यांचा हा स्टंट सुरू आहे. कायद्याच्या विरोधात राणा दाम्पत्यांनी वर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा हेतू 
राज्यात जनक्षोभ तयार करून वातावरण बिघडवायचे, दंगली घडवायच्या, अस्वस्थता निर्माण करायची, अशांतता माजवायची, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हेतू भाजपचा आहे, असा आरोप वळसे-पाटील यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट कशासाठी? राणा दाम्पत्यांनी असे वर्तन करायला नको होते. हिंदुत्व हा दोन पक्षांतील विषय आहे. यावर मी बोलणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातील पोलिसांवर मुख्यमंत्री दबाव टाकत असल्याच्या नवनीत राणा यांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पोलिसांना आदेश देत नाहीत. या संदर्भातील सर्व निर्णय हे पोलिस आयुक्तांनी घेऊन कारवाई करायची असते आणि त्या दृष्टीने मुंबईचे पोलिस आयुक्त कारवाई करतात. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुणीही या संदर्भातील कुठल्याही वेगळ्या सूचना आम्ही देत नाही. कायद्याविरोधात वर्तन केल्यास पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्या वतीने आज राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय; पण ते इतके सोपे नाही. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे, असा दावाही वळसे पाटील यांनी यावेळी केला.

Share