शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरी शनिवारी नांदेडमध्ये एकाच व्यासपीठावर

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी हे येत्या शनिवारी (१४ मे) नांदेड येथे एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पवार, ठाकरे, गडकरी यांच्यासह कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात ही नेतेमंडळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन १४ मे रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सोबतच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हिंगोली, नांदेड, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘गोदावरी अर्बन’च्या अध्यक्षा सौ.राजश्री हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, ‘गोदावरी अर्बन’चे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व संचालक उपस्थित होते.

‘गोदावरी अर्बन’ने अत्यंत कमी कालावधीत सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकिक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून’ याच विश्वासाला पुढे नेण्यासाठी ‘गोदावरी अर्बन’ने आपला कार्यविस्तार वाढविला आहे. सभासद, ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी ‘गोदावरी अर्बन’ ने तरोडा नाका, पूर्णा रोड, नांदेड येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांसह ‘सहकारसूर्य’ हे नवे मुख्यालय उभारले आहे, असे खा. हेमंत पाटील यांनी यांनी सांगितले.

सहकार परिषदेचे आयोजन
‘गोदावरी अर्बन’ च्या मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे हे ‘ग्रहणाधिकार भारतीय करार कायदा व आवश्यकता’ व भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम सदस्यत्वासाठी आरबीआय व सहकार खात्याची धोरणे’ या विषयावर तर महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे ‘नवीन सहकारी धोरण आणि महाराष्ट्र राज्य’ तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे ‘पतसंस्थांपुढील आव्हाने व शासनाकडून अपेक्षा’ यावर तर फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे हे ‘बहुराज्यीय कायद्यातील अपेक्षित सुधारणा’ तसेच भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर हे ‘सामान्यांसाठी सहकारी चळवळीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षा सौ.राजश्री हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Share