औरंगाबादेतील ऐतिहासिक वारसा अजिंठा वेरूळ लेणी

आज जागतिक वारसा दिवस अर्थात वर्ल्ड हेरिटेज डे आहे. आपल्या सगळ्यानाच माहीत आहे आपल्या औरंगाबाद मधील अजिंठा वेरूळच्या लेण्याना युनिस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केल्या आहेत.

भारतात सुमारे बाराशे लेण्या आहेत. त्यातल्या जवळजवळ ८०० लेण्या महाराष्ट्रात निर्माण झाल्यात. देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम डोंगराच्या मध्यभागांपासून  झालेले आढळते. वेरूळच्या लेणीच खोदकाम ‘आधी कळस, मग पाया’ या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत करण्यात आलय या लेण्या बनवत असताना हवा-प्रकाशाबरोबर पर्यावरणाचाही अभ्यास या शिल्पकारांनी केला होता. इतकच नाही या लेणी समूहात १६ हिंदू, १३ बौद्ध, तर पाच जैन धर्मीय लेण्या आढळतात. तीन धर्माचे अधिष्ठान असल्याच बघायला मिळत. या सर्व लेण्या बेसाल्ट खडकांपासून बनवण्यात आल्या आहेत.

अजिंठा-वेरूळची लेणी ही स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे हा होता अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून झाली. कालांतराने तिचे रुपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. या लेण्यांतून भगवान बुद्धाचा परिचय सर्वसामान्य लोकांना होतो.

सर्व वेरुळ लेण्या राष्ट्रकूट घराण्यासारख्या हिंदू राजवटीमध्ये बांधल्या गेल्या, ज्यांनी हिंदू आणि बौद्ध लेण्यांचा काही भाग बांधला. आणि यादव वंश, ज्यांनी अनेक जैन लेण्या तयार केल्या. स्मारकांच्या बांधकामासाठी व्यापारी आणि प्रदेशातील श्रीमंत यांनी निधी पुरविला.

बौध लेणी 

वेरुळची बौद्ध लेणी ही येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत.बारा बौद्ध लेण्यांपैकी अकरा प्रार्थना हॉल असलेले मठ आहेत. यामध्ये डोंगराच्या तोंडावर कोरलेल्या मोठ्या बहुमजली इमारती, राहन्याच्या खोल्या, झोपेच्या जागा, स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांचा समावेश आहे.

मठातील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध, बोधिसत्व आणि संतांच्या कोरीव मूर्ती आहेत. लेणी क्रमांक ५ , १०, ११  आणि १२ या  स्थापत्य कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बौद्ध लेण्या आहेत. लेणी ५ क्रमांकची एलोरा लेणी लेण्यांमध्ये अद्वितीय आहे कारण या लेणीला हॉलच्या रूपात डिझाइन केले गेले आहे. ज्याच्या मध्यभागी समांतर बेंचेस आहेत आणि मागील बाजूस बुद्ध मूर्ती आहे.

हिंदु लेणी 

सहाव्या शतकाच्या मध्यापासून ते आठव्या शतकाच्या अखेरीस दोन टप्प्यांत हिंदु लेण्या तयार करण्यात आल्या. सहाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात नऊ गुफा मंदिरांची निर्मीती करन्यात आली. लेण्यांवर क्रमाने काम करण्यात आले, सुरुवातीला लेणी २८,२७ आणि १९  बनवण्यात आल्या. त्यानंतर लेणी क्र. २९ आणि २१ या लेण्या लेणी क्रमांक २० आणि २६ सोबत बांधण्यात आल्या. लेणीक्रमांक १४,१५आणि १६  या राष्ट्रकुटाच्या काळात बांधल्या गेल्या, त्यापैकी काही आठव्या ते दहाव्या शतकाच्या आहेत.

हिंदूं लेण्यांचे काम हे जैन आणि बौद्ध लेण्यांपूर्वी सुरू झाले होते. या सुरुवातीच्या लेणी हिंदु देवता शिवशंकर यांना अर्पण केल्या गेल्या होत्या. येथील मुर्ती पाहुन असे सूचित होते की कारागिरांनी हिंदू धर्माच्या इतर देवी-देवतांनाही समान आदर दिला. या लेण्यांमधील मंदिरांचे एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मध्यभागी एक शंकराची पिंड आहे आणि बाजुने प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा दिलेली आहे.

जैन लेणी 

उत्तर टोकाला पाच जैन लेण्या आहेत. या लेण्या नवव्या आणि दहाव्या शतकाच्या सुरूवातीस बनवल्या गेल्या. या लेणी बौद्ध व हिंदू लेण्यांपेक्षा लहान आहेत पण त्यांत अत्यंत तपशीलवार कोरीव काम आहे. त्या आणि नंतरच्या काळातील हिंदू लेण्या एकाच वेळी बनविल्या गेल्या. जैन मंदिरांमधील कामांमध्ये देवी-देवता, यक्ष, यक्षी आणि मानवी भक्तांच्या कोरलेल्या मूर्तींचा समावेश आहे.

विश्वकर्मा लेणी

हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

राजविहार लेणी

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली ही लेणी तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंह प्रतिमा आहेत. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

आजही या लेण्या बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. विशेषतः पावसाळ्यात या लेण्या हिरव्या वनराई मुळे विलोभनीय दिसतात. अजिंठा लेणी चित्रे आणि शिल्पे आहेत ज्यात बौद्ध तत्त्वज्ञान आणि बुद्धांच्या धार्मिक शिकवणींचा प्रचंड प्रभाव आहे. गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध घटना आणि जातक कथा या लेण्यांच्या भिंतींवर मांडलेल्या आहेत.

Share