अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले;संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या १७ मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग तर दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे, तर एफसीएफएस फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यात दरवर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रात ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून वरील क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाली होती. यंदा दहावीच्या परीक्षा ४ एप्रिलला संपल्या आहेत. आता सन २०२२-२३ मधील ११ वी प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. १० वी परीक्षेचा जाहीर होण्यापूर्वी १७ मेपर्यंत अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग अर्थात प्रवेश अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. १० वीचा निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल, तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उदबोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी. मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवण्याबाबत जागृत करावे. त्यासाठी संबंधित महसूल यंत्रणेस विद्यार्थ्यांना कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत विनंती करणे, माध्यमिक शाळांनी नववी-दहावीमधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतानाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

असे आहे अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

 •  विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उदबोधन –एप्रिल २०२२
  अर्जाचा भाग एक भरणे सराव –१ ते १४ मे
 • विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी, अर्ज भाग-१ भरणे, तपासणे – दि.१७ मे ते दहावी निकालापर्यंत
 • उच्च माध्यमिक शाळा नोंदणी – दि.२३ मे ते दहावी निकालापर्यंत
 • अर्जाचा भाग-२ भरणे – दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू – दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • प्रवेश फेर्‍या व अ‍ॅलॉटमेंट प्रवेश
 • पहिली नियमित फेरी –१० ते १५ दिवस
 • दुसरी नियमित फेरी – ७ ते ९ दिवस
 • तिसरी नियमित फेरी – ७ ते ९ दिवस
 • विशेष फेरी – ७ ते ८ दिवस
Share