मुंबई- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती श्री. संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर कालपासून उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. pic.twitter.com/lklivctHwE
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) February 27, 2022
त्याचबरोबर मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती देखील आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.