‘सुपर स्प्रेडर’ आमदार आंदोलनात कसे?-काँग्रेस

नागपूरः नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलच पेटले आहे. विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असुन,  पूर्व नागपूरात भाजपतर्फे पटोले विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे विलगीकरण सोडून सहभागी झाले होते. असा आरोप काँग्रेसने केला आहे.

आमदार कृष्ण खोपडे यांनी पाच दिवसापूर्वी सोशल मीडियावर ‘मी कोरोना पॉझिटीव्ह’ आहे अशी पोस्ट केली होती. कृष्णा खोपडे विलगीकरणात असताना, आंदोलनात कसे सहभागी झाले असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. कोरोना विलगीकरण सात दिवसाचे असते. तुमच्या दृष्टिकोनातून विषय महत्त्वाचा वाटत असेल, तर आंदोलन करावे. पण, अशा पद्धतीने सुपर स्प्रेडर बनने हे चुकीचे आहे. माझी नागपूर पोलिसांना विनंती आहे की, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. अशी विनंती अतुल लोंढे यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणतात की, त्या गावगुंडाला अटक केलेली आहे. पण, अद्याप पोलिसांनी हे स्पष्ट केलेले नाही.  गावगुंड मोदीला पोलिसांनी बोलावले होते. त्याचा २०२० चा रेकार्ड आहे. त्यामुळे आता भाजपला विचार करायचा आहे की, गुंड मोदींना सपोर्ट करायचा की नाही. उमेश घरडे ऊर्फ मोदी असे स्वतःला तो म्हणतो. हाच तो गावगुंड असे लोंढे यांनी स्पष्ट केले.

कृष्णा खोपडे यांचे स्पष्टीकरण

आमदार कृष्णा खोपडे म्हणतात, मी बारा जानेवारीला पॉझिटिव्ह आलो. त्यानंतर पाच दिवस आपल्या घरी होतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले. मला सुरवातीपासूनच मला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. सर्दी , खोकला , ताप नाही. तर मी बाहेर निघू शकतो का? आरोग्य अधिकारी म्हणाले, पॉझिटिव्ह आल्यापासून तीन दिवस काहीच लक्षणे नसतील, तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाला गेलो, असे स्पष्टीकरण आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले. पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यानंतर गर्दीतून जाणं आमदारांना कितीपत योग्य वाटलं, हे तेच जाणोत. खरं तर नवीन गाईडलाईन्सनुसार, सात दिवस गृहविलगीकरणात राहणे आवश्यक आहे.

 

Share