४८ तासांत माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा दाखल करू -किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे भित्रे आहेत. ते दुसऱ्यांना तक्रार करायला लावतात. ‘आयएनएस विक्रांत’ मदतनिधी घोटाळ्याप्रकरणी त्यांनी खोटे आरोप केले. ठाकरे व राऊत यांनी पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्यावर बदनामी, मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका जतन करण्यासाठी जमा केलेल्या मदतनिधीत अपहार केल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांवर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उच्च न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याशिवाय, खा. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप केला होता. आता किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा. मेघा सोमय्या यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे.

यासंदर्भात सोमवारी (२ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ‘महाडरपोक’ लोक आहेत. मागील ३ महिन्यात त्यांनी १२ वेळा स्टंटबाजी केली. ७,५०० कोटी अमित शाहांना दिले, ४५० कोटी जुहूची जमीन असे आरोप केले. त्यांना एका आरोपावरही कागदपत्र सादर करता आले नाही. मी उद्धव ठाकरे आणि संजय पांडे यांना आव्हान देतो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या ‘विक्रांत’ घोटाळ्याचा आरोप केला. नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डर्सनी मनी लाँड्रिंग केली, असा आरोप केला. आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कागदपत्र आणि खात्यांची माहिती घेऊन पोलिसांकडे पाठवावे. ते भित्रे लोक आहेत. त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोटे बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासात माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

५७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला; पण ५७ पैशांचाही पुरावा दिला नाही!
किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांमार्फत माझ्यावर आरोप केले. ते किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला जेलमध्ये टाकायला निघाले होते. संजय राऊत यांनी माझ्यावर ‘विक्रांत’ युद्धनौका मदतनिधीत ५७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला;पण राऊत यांनी ५७ पैशांचा पुरावा दिला नाही. आता त्यांनी ‘ईओडब्ल्यू’मध्ये जावे आणि तिथे कागदपत्रे द्यावेत. आता संजय राऊत कागदपत्रे का देत नाहीत. म्हणून हे भित्रे लोक आहेत. ते त्यांचा भ्रष्टाचार उघड होतोय आणि त्यांची संपत्ती जप्त होणार म्हणून घाबरून काहीही आरोप करत आहेत.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून देणार 
आता मी आव्हान देतो. आता मी मुंबई पोलिसांना सांगणार आहे की, त्यांनी संजय राऊत यांना बोलवावे आणि ५७ कोटी घोटाळ्याची कागदपत्रे त्यांच्याकडून घ्यावीत. म्हणून माझी पत्नी प्रा. मेधा सोमय्या यांनी नोटीस दिली आहे. ‘लाथों के भूत बातों से नही मानते’ म्हणतात ते खरेच आहे. उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी दोन दिवसात माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्यावर बदनामी, मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. ठाकरे आणि राऊत यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना प्रत्येक क्षणी असे वाटते की…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्येक क्षणी असे वाटतेय की, त्यांच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणेही स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये, अनेक मंत्री बेलवर, ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे, कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंची घोटाळ्याची लंका जळू शकते, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Share