…तर राज्यात तांडव होणार, त्याला आम्ही जबाबदार नाही!

मुंबई : आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. राज्यात आम्हाला जीवे मारण्यापर्यंत परिस्थिती जाणार असेल, तर प्रतिक्रिया येणार. तांडव होणार. तांडव झाल्यावर काय केसेस टाकायच्या त्या टाका. त्याला आम्ही जबाबदार नाही, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

शनिवारी आ. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खा. नवनीत राणा यांनी मुंबईत ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करण्यापासून माघार घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना भेटण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली. यावरून राज्यातील राजकारण आता चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू. दगडाची भाषा दगडानं करू आणि गोळ्यांची भाषा गोळ्यांनी करू; पण आम्हाला राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही. मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते, नातेवाईक रस्त्यावर धिंगाणा घालत असतील तर राज्याच्या जनतेनं कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात कुणाकडून अपेक्षा ठेवावी?” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. “काल मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक धिंगाणा घालत होते. मुख्यमंत्री रस्त्यावर येऊन शिवसेना कार्यकर्त्यांना भेटतात, पोलिसांवर दबाव टाकतात. याला काय म्हणायचं? तुम्हाला भाजपच्या आंदोलनाची माहिती मिळाली की, जमावबंदी लावता. मग काल का नाही मुंबईत जमावबंदी लागू केली? मुंबईच्या पोलिस आयुक्तांना काय पेरोलवर ठेवलंय का? तुमचं सरकारसोबत काँट्रॅक्ट झालं असेल तर एकदाच सांगा. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवणं बंद करतो. कोल्हापुरात मला मारून टाकण्याचा प्रयत्न झाला. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसोबत तेच झालं”, असे राणे म्हणाले.

 

आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड आले तर?

“राज्यात आम्हाला जीवे मारण्यापर्यंत परिस्थिती जाणार असेल, तर प्रतिक्रिया येणार. तांडव होणार. तांडव झाल्यावर काय केसेस टाकायच्या त्या टाका. त्याला जबाबदार आम्ही नाही. आज रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. काल खार पोलिस स्टेशनच्या समोर काँक्रीटची वीट सोमय्यांवर टाकली जाते. पोलिस काय करत होते. उद्या शिवसेनेच्या दिशेने, वरूण सरदेसाईंच्या दिशेने, आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड यायला लागले, तर काय करणार तुम्ही? त्यांच्याही रेंज रोव्हर आहेत ना. एकट्या मोहित कंबोज यांचीच रेंज रोव्हर आहे का?” असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिला.

मुंबईत गँगवॉर सुरू करायचेय का?
“ही राजकीय लढाई राहिलीच नाहीये. इथे गँगवॉर सुरू झाला आहे. अघोषित गँगवॉर आहे हा. तुम्हाला दाऊद, छोटा शकील या लोकांना बाहेर काढायचं होतं. आता शिवसेनेच्या निमित्ताने तुम्हाला मुंबईत गँगवॉर सुरू करायचंय का? आणि आम्ही काय बघत बसायचं का? चालणार नाही”, असे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

Share