पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (रविवार) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी देण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि त्यांनी केलेली सेवा लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. या कार्यक्रमास मंगेशकर कुटुंबीयांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्यापासून दूर राहिले. कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांच्या प्रेमाचे प्रतीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लतादीदी या स्वरसम्राज्ञी आहेतच; पण त्याबरोबरच ती माझी मोठी बहीण होती. प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लतादीदींकडून मला मोठ्या बहिणीसारखे प्रेम मिळाले आहे. यापेक्षा जीवनातील मोठे सौभाग्य काय असू शकेल? आता रक्षा बंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसेल. पुरस्कार, सन्मान स्वीकारणे यांपासून मी जरा दूरच असतो. मात्र, लतादीदींसारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. म्हणून मी हा विशेष पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो. साडेचार दशकांपूर्वी माझी लतादीदींशी ओळख झाली. आमची भेट सुधीर फडके यांनी घडवून आणली. तेव्हापासून आजपर्यंत माझे त्यांच्या कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत. हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. लतादीदी सर्वांच्या होत्या. हा पुरस्कारही सर्वांचा आहे, हा पुरस्कार मी देशाला समर्पित करतो. मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादाने मी माझ्यातील उणीवा भरुन काढण्याचा प्रयत्न करेन. मंगेशकर कुटुंबाने मला दिलेल्या या पहिल्या पुरस्कारासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

लतादीदी वयानेही आणि कर्तृत्वानेही मोठ्या होत्या -मोदी

लतादीदी वयानेही मोठ्या होत्या व कर्मानेही मोठ्या होत्या. या पुरस्काराशी लतादीदींच्या वडिलांचे नावही जुळले आहे. संगीतासह राष्ट्रभक्तीची जी भावना दीदींच्या मनात होती. त्याचा स्त्रोत त्यांचे वडील होते. स्वातंत्र्यलढ्यात दीनानाथ मंगेशकर यांनी ब्रिटीश व्हॉईसरॉय यांच्यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गीत गायले. त्यांनी या माध्यमातून एकप्रकारे इंग्रजांना आव्हानच दिले होते. हे धाडस, देशभक्ती त्यांनी आपल्या कुटुंबाला वारशात दिली, असे मोदी म्हणाले.

लतादीदींच्या रूपात संगीताची ताकद भेटली

संगीत तुमच्यात वीरता भरते. संगीत मातृत्व आणि प्रेमाची भावना देऊ शकते. संगीत तुम्हाला देशभक्ती आणि कर्तव्याच्या शिखरावर नेऊ शकते. आपण सर्व भाग्यवान आहोत की, संगीताची ही ताकद लतादीदींच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाली. लतातादीदींनी  देशातील ३० हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी, संस्कृत किंवा इतर भारतीय भाषा असो, लताजींचा आवाज प्रत्येक भाषेत सारखाच आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कोरोना काळात उल्लेखनीय कार्य 
लतादीदींच्या सूरांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात गुंफले. त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची स्थापना केली. कोरोना काळात या रुग्णालयाने मोठे कार्य केले, असेही मोदी म्हणाले. याप्रसंगी लतादीदींच्या भगिनी आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट आणि या ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची माहिती उपस्थितांना दिली.

https://twitter.com/ANI/status/1518205705546727425?s=20&t=tQ6aPERENfprYnPvvfCamQ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यक्रमाला दांडी
गत काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची चर्चा होती; पण उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. ते राणा दाम्पत्याच्या विरोधात ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणाऱ्या चंद्रभागा शिंदे नामक ८० वर्षीय वयोवृद्ध महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते.

 

Share