उत्तर प्रदेशात शिवसेना ५० ते ५० जागांवर लढणार- राऊत

उत्तरप्रदेश :  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ६० जागांवर निवडणुक लढणार असल्याची माहिती शिवसेना खा. संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची तयारी देखील करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

शिवसेना खा. संजय राऊत आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते उत्तर प्रदेशात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशातील निकालाने देशाची दिशा आणि दशा दाखवली जाते. त्यामुळे संपूर्ण देश उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहत आहे. मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलो आहे. उत्तर प्रदेश ही देशातील सर्वात मोठी विधानसभा आहे. याच राज्यातून पंतप्रधान निवडून येतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही ५० ते ६०उमेदवार आम्ही उभे केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 15 उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या आणि सातव्या टप्प्यात ३० उमेदवार उभे करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

याचबरोबर, आमची कोणत्या मोठ्या पक्षाशी आघाडी झालेली नाही. हे खरं आहे परंतु, छोट्या पक्षांसह प्रत्येक भागात ज्यांची ताकद आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही निवडणूक लढवत आहोत. मात्र मी तुम्हाला यावेळी हे सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही १५ ते २० जागांवर लोकसभा निवडणुकी लढवणार आहोत, त्याची तयारी सुरू आहे आणि आमच्या पक्षाने हा निर्णय घेतला आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही यंदा १०० च्या आसपास लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहोत.

Share