चार चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :  कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षापासून ठप्प झालेली सिनेसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सरकारने ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. हिंदी चित्रपटाच्या तारखा जाहीर होत असताणाच एकाच दिवशी मराठी चार चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत.

काल मराठीतील चार चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहे. फास, पांघरूण, लोच्या झाला रे, लॉ ऑफ लव्ह हे चित्रपट प्रदर्शीत करण्यात आले आहे. फास चित्रपटात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘फास’ हा चित्रपट समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाद्वारे अतिशय महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने वाढत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

पांघरूण ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी ‘एक विलक्षण प्रेम कहाणी’ प्रेक्षकांना ‘पांघरूण’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांनी संगीतबद्ध दिलं आहे. तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेल, अविस्मरणीय संगीत व भावनिक दर्जेदार असे कथानक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

‘लोच्या झाला रे.’ या चित्रपटाच अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लोच्या झाला रे’ हा एक धमाकेदार विनोदी कौटुंबिक चित्रपट असणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित ‘लोच्या झाला रे’ या चित्रपट आहे. लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे.

लॉ ऑफ लव्ह हे नाव जसं हटके आहे अगदी तशीच त्याची कहाणी देखील हटके आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलावार कायद्यारुपी गळ टाकल्यावर त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो.या सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अभिनेते अनिल नगरकर आणि अभिनेत्री प्राची पालवे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निमिर्ती जे. उदय यांचीच आहे. सिनेमातील संवाद जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत.

Share