शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

नवी दिल्ली : स्वत:ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मागील साडेसहा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी गेल्या साडेसहा वर्षांपासून मुंबईतील भायखळा तुरुंगात आहे.

इंद्राणी मुखर्जीचा याआधी अनेकदा जामीन फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाने तिला जामीन दिलेला नव्हता. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर तिचीच मुलगी शीना बोरा हिची आपला माजी पती, ड्रायव्हर यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. शीना बोरा हिच्या हत्येत तिचा पती पीटर मुखर्जीचाही हात होता. याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांत इंद्राणीने एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने इंद्राणी मुखर्जीला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

इंद्राणी मुखर्जी हिला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, ”या प्रकरणाची सुनावणी बराच काळ चालू शकते. हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्ती जामिनाचा हक्कदार असते, असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणी मुखर्जीला सशर्त जामीन मंजूर करत आहोत”.

या प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी याची २०२० मध्ये जामिनावर सुटका झाली आहे. यापूर्वी सीबीआयने इंद्राणी मुखर्जीच्या जामिनाला विरोध केला होता. इंद्राणी मुखर्जी यांनी स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या करण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे, असे सीबीआयने निवेदनात म्हटले होते. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जाबाबत सीबीआयला नोटीस बजावत उत्तर मागितले होते.

इंद्राणी मुखर्जीचे वकील मुकुल रोहतगी न्यायालयात म्हणाले की, इंद्राणी मुखर्जी मागील साडेसहा वर्षांपासून तुरुंगात आहे. पुढील १० वर्षांतही हा खटला संपणार नाही. १८५ साक्षीदार तपासणे अद्याप बाकी आहे. मागील दीड वर्षाच्या काळात एकाही साक्षीदाराची चौकशी झालेली नाही. तसेच इंद्राणी यांचा नवरा जामिनावर बाहेर आहे. इंद्राणी मुखर्जीलाही मानसिक आजार आहेत. इंद्राणी मुखर्जी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अलीकडेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता; पण उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.

काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण?

२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोरा हिची हत्या करण्यात आली होती. शिनाच्या हत्येनंतर इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. २०१५ मध्ये ही घटना उघडकीस आल्यावर कळले की, इंद्राणी मुखर्जीने शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असताना पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांनी घटस्फोट घेतला.

Share