मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर आधारित ‘जलनायक-डॉ. शंकरराव चव्हाण’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या माहितीपटाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘फादर्स डे’ चे औचित्य साधत ही घोषणा केली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज ट्विट करून ‘जलनायक-डॉ. शंकरराव चव्हाण’ माहितीपटाचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांना जलक्रांतीचे जनक मानले जाते. शंकरराव चव्हाण यांनी विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली. पैठण येथील जायकवाडी धरण, नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प यासारखे अनेक पाटबंधारे प्रकल्प शंकररावांनी अनेक अडचणींवर मात करून पूर्णत्वास नेले. या प्रकल्पांबरोबरच कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, तितरी, सूर्या, अप्पर वर्धा, पेंच, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न तेरणा, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, नांदूर मधमेश्वर, लेंडी, खडकवासला, इटियाडोह, पूर्णा, मुळा, काळमावाडी, गिरणा, घोड, सुखी आदी पाटबंधारे प्रकल्पांच्या कालव्यांतून वाहणारे पाणी आजही शंकररावांच्या कर्तृत्वाची गाणी गात आहेत. या क्षेत्रात त्यांनी जो अमीट ठसा उमटविला, हे प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी शंकररावजींनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळे शंकरराव चव्हाण यांना ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून ओळखले जाते.
माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर 'जलनायक – डॉ. शंकरराव चव्हाण' हा माहितीपट तयार करण्यात आला असून, लवकरच त्याचे लोकार्पण होईल. आज #FathersDay च्या निमित्ताने ही घोषणा करताना मला मनःस्वी आनंद होतो आहे.#जलनायक pic.twitter.com/lNdgrcbe46
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 19, 2022
महाराष्ट्राच्या ‘जलसंस्कृतीचे जनक’ असाही शंकररावजींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये, यासाठी विरोधकांनी त्यावेळी रान पेटविले होते. त्यांचा विरोध पत्करून शंकररावांनी ‘नाथसागर’ साकार केला. याच नाथसागरातून औरंगाबादसह अनेक शहरांना व गावांना पिण्याचे पाणी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही पाणी पुरविले जाते. आज औरंगाबाद शहराचा जो औद्योगिक चेहरामोहरा बदलला आहे, त्या विकासाचे आद्य शिल्पकार म्हणून शंकरराव चव्हाण यांना ओळखले जाते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांना दोन वेळा काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे शंकररावांनी अक्षरशः सोने केले. महाराष्ट्राच्या प्रशासनाला शिस्त लावली. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव या तीन पंतप्रधानांच्या समवेत शंकररावांना केंद्रात शिक्षणमंत्री, नियोजनमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री इ. खात्यांचे मंत्री व निकटवर्ती सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गृहमंत्री म्हणून काम करताना शंकररावांनी जे कर्तव्यकठोर आणि धाडसी निर्णय घेतले, त्यामुळे त्यांच्या त्या कारकिर्दीची तुलना अनेकजण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारकिर्दीशी करतात. गृहमंत्री म्हणून शंकररावांनी काश्मीर प्रश्न, आसामचा प्रश्न, पंजाबमधील अतिरेकी कारवाया आदी नाजूक समस्या कौशल्याने सोडविल्या. २०२०-२१ हे वर्ष जलक्रांतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या वर्षाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलनायक-डॉ. शंकरराव चव्हाण’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या माहितीपटातून डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत पडणार आहे.
बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. युवा प्रतिभाशाली दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया व श्रीजया चव्हाण या माहितीपटाच्या सहनिर्मात्या आहेत.