कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काॅंग्रेस

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. राज्यपाल  कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी  अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करत असतो. हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत. असे पटोले म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं’ असं राज्यपाल म्हणाले. तसंच, ‘शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.

Share