मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीम गँगशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत न्यायालयाने कठोर टिपण्णी केल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा स्वत: बिल्डर आहे. बिल्डर लोकांना अशा गोष्टी लगेच कळतात. त्यामुळे त्यांना नवाब मलिक यांचा घोटाळा आधीच माहीत होता, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे दाऊद इब्राहीम गँगशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांपासून कारागृहात आहेत. मलिकांचे दाऊदशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुराव्यातून समोर आले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे, आता या शरद पवारांसोबत रस्त्यावर
माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, नवाब मलिक दाऊद गँगचे सदस्य हे सिद्ध झाले; पण आता महाराष्ट्राला ही चिंता आहे की, जेलमध्ये गेल्यावर नवाब मलिकांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्माण झाले आहेत का? याबद्दल ठाकरेंनीच स्पष्टता करावी. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा म्हटले की, शरद पवारांचे दाऊदशी संबंध आहेत; पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी भागीदारी केली आणि आता शरद पवारांचे पार्टनर दाऊदशीपण भागीदारी केली. कोट्यवधींची मालमत्ता फक्त लाखांत कशी घेतली? उद्धव ठाकरेंपासून सारे मंत्रिमंडळ नवाब मलिकांसाठी मैदानात उतरले होते. आता न्यायालय सांगतेय की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. असे असेल तर आता उद्धव ठाकरे, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की, न्यायालय देखील पाकिस्तानचे आहेत, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार, असेही सोमय्या म्हणाले.
शरद पवार, उद्धव ठाकरेंना सगळे व्यवहार माहिती होते
नवाब मलिक यांचे सर्व व्यवहार उद्धव ठाकरेंना माहिती होते, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्यांनी यावेळी केला. खरे तर ही चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सगळे आर्थिक व्यवहार माहिती होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तर बिल्डर आहे. बिल्डर लोकांना सगळं कळतं. ‘मातोश्री’पासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळं माहिती होतं. उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. हे नवाब मलिक काही लाखांत १०० कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे उत्तर द्या, असे किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊत रोज मनोरंजन करतात
संजय राऊत रोज मनोरंजन करतात. रोज काही ना काही बोलतात. आता राज्यातील जनता हसायला लागली आहे. मूळ मुद्दा त्यांना डायव्हर्ट करायचा आहे. त्यांना कल्पना होतीच की, नवाब मलिक–दाऊदचे संबंध बाहेर येणार. म्हणून हे थोतांड उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांद्वारे लक्ष वळवण्यासाठी हे केले. एवढे सिद्ध होऊनही मलिकांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले जात नाही. उद्धव ठाकरेंना धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.
सोमय्या म्हणाले, मी स्टेजवर बाळासाहेब ठाकरेंची भाषणे ऐकली आहेत. १९९२-९३ मध्ये ज्या दंगली झाल्या, त्यानंतर शरद पवार आणि दाऊद एकाच विमानात गेले असे सांगणारी बाळासाहेबांची भाषणे मी ऐकली आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी मुलाने सगळेच गहाण ठेवायचे, हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.