श्रीलंकेत मोठी उलथापालथ; महिंदा राजपक्षेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय

कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर श्रीलंकेत राजकीय संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास सहमती दर्शवली आहे.

“राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी, नवीन पंतप्रधान आणि संसदेतील सर्व पक्षांचा समावेश असलेले मंत्रिमंडळ निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय परिषद नियुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे,” असे मैत्रीपाल सिरिसेना यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची आज भेट घेतल्यानंतर सांगितले. राष्ट्रपतींनी आज (शुक्रवारी) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास तयारी दर्शवली. तसेच सर्वपक्षीय सरकार बनवण्यावर यावेळी चर्चा झाली. नवीन पंतप्रधानांच्या निवडीसाठी राष्ट्रीय परिषदेची स्थापन केली जाईल. मंत्रिमंडळात संसदेतील सर्व पक्षांचा समावेश असेल, याबाबत राष्ट्रपती राजपक्षे हे राजी असल्याचे सिरिसेना यांनी सांगितले.

श्रीलंकेत सध्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थिती आहे. यामु‍ळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह राजपक्षे कुटुंबातील नेत्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. गोटाबाया राजपक्षे यांच्या अगोदर मैत्रीपाल सिरिसेना हे राष्ट्रपती होते. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप करत श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. श्रीलंकन नागरिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपती राजपक्षे बंधूच्या राजीनाम्यासाठी श्रीलंकेतील नागरिकांनी गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी (२८ एप्रिल) देशभर पुकारलेल्या संपात मैत्रीपाल सिरिसेना हेही सहभागी झाले होते.

परकीय कर्जाचा डोंगर; महागाई प्रचंड वाढली
श्रीलंकेत महागाई प्रचंड वाढलेली आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने लोकांचे जगणे अवघड झाले आहे. परकीय कर्जाचा डोंगर, लॉकडाऊन, तीव्र महागाई, इंधन पुरवठ्यातील तुटवडा, परकीय चलन साठ्यात झालेली घसरण आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. श्रीलंकेला यावर्षी ७ अब्ज डॉलर परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोरोना काळापूर्वीच संकटात सापडली होती. लॉकडाऊनमुळे त्यात आणखी भर पडली. त्याचा असंघटित क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. ज्यात सुमारे ६० टक्के कर्मचार्‍यांचा वाटा आहे.

कोरोनामुळे पर्यटन उद्योग कोलमडला
कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक उत्पन्‍नात मोलाचा वाटा असलेला पर्यटन उद्योग बुडालेला आहे. पर्यटन व्यवसायावर श्रीलंकेतील २५ लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. देशाच्या उत्पन्नात पर्यटनाचा १० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. यातून देशाला ५ अब्ज डॉलर (जवळपास ३७ हजार कोटी रुपये) परकीय चलन मिळते. कोरोनामुळे हा उद्योग पुरता कोलमडला आहे.

Share