भाजप-मनसे युतीचा अद्याप प्रस्ताव नाही : फडणवीस

मुंबई : मनसे आणि भाजप युतीच्या बातम्या पसरविण्यात आल्या आहेत. या बातम्या कपोलकल्पित आहेत. काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. युतीबाबत आमची कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. कोणताही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

सध्या भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधून भाजपचे कौतुक करताना दिसत आहेत. धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी आणखीच जोर धरला आहे. मनसे आणि भाजपची युती कधी होणार? असा प्रश्न आज भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, ते म्हणाले, भाजप व मनसे युती संदर्भात आमची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की, अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत. आम्ही ज्या भूमिका मांडतो त्याच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत; पण युती करण्यासंदर्भात आमची कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया फारच अपरिपक्व आहेत.

“जो बीत गई, वो बात गई”!
२०१७ साली राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी नुकताच एका कार्यक्रमात केला होता. यासंदर्भात फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी “जो बीत गई, वो बात गई” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

इंधनदरवाढीवरून ठाकरे सरकारवर टीका
पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आढावा बैठकीत सांगितले होते; परंतु राज्य सरकारचा दृष्टिकोन अतिशय लहान आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांनी या सरकारला उघडे पाडले आहे. राज्यातील ठाकरे सरकारने इंधन दरावरील कराच्या माध्यमातून १ लाख २० हजार रुपये कमावले;पण आता दर कमी करण्याची वेळ आल्यानंतर वेगवेगळे बहाणे केले जात आहेत. देशातील भाजपशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. गुजरातमध्ये पेट्रोलचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत १५ रुपयांनी कमी आहेत, असा निशाणा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला.

खोटारडेपणा बंद करा;जनतेला दिलासा द्या
केंद्र सरकारकडे जीएसटीची सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये थकबाकी आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे; पण वित्त राज्यमंत्र्यांनी जीएसटीच्या पैशांबाबत आकडेवारी दाखवत राज्य सरकारचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. या सरकारने बहाणेबाजी बंद केली पाहिजे. तत्काळ पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

सेक्युलर पक्षच जातीयवादाला जबाबदार
देशातील जातीय परिस्थिती आणि सांप्रदायिकतेचे जनतेचे जनक सेक्युलर पक्ष आहेत. त्यांनी लांगुलचालनाच्या माध्यमातून देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांची दरी तयार केली आहे. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करून दुर्भावना तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना सर्वांना लागू आहेत. ते जाती-धर्मात भेदभाव करत नाहीत; पण काही पक्ष अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.

Share