एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ऑफर!

मुंबई- राज्यात नवे सत्ता समीकरण जुळण्याची चर्चा सुरू झाली आहे. चक्क एमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर दिली असून राजकीय वर्तुळात नव्या समीकरणावर चर्चा रंगल्या आहेत. एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना माहिती दिली आहे.

भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असा नारा काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासोबतच शरद पवार यांनी देखील दिला होता. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसलाच एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी आव्हान दिलं आहे. “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

Share