मुंबई : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोनच दिवसांत सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मुंडे यांनी आपल्या नियमित कामांना सुरुवात केली आहे. १६ एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ४८ तासांच्या आतच त्यांनी मंत्रालयात येऊन आपल्या कामांना सुरुवात केली.
धनंजय मुंडे यांना मंगळवारी (१३ एप्रिल) अचानक भोवळ आली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. चार दिवसांच्या उपचारानंतर मुंडे यांना शुक्रवारी १६ एप्रिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर दोनच दिवसांत ते मंत्रालयात दाखल झाले. आजारपणामुळे आठवडाभरापासून मुंडे मंत्रालयात आले नव्हते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते मंत्रालयात आले. मंत्रालयात आल्यावर आपली वाट पाहत असलेल्या नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात बसून नियमित कामांना सुरुवात केली. आपल्या टेबलवरील ढिगभर फाईल्सवर कटाक्ष टाकत पेंडिंग असलेल्या फाईल्सवर त्यांनी काम केले. यादरम्यान भेटायला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. आता प्रकृती उत्तम आहे, काळजी नसावी, असे विचारपूस करणाऱ्या व्यक्तींना ते वारंवार सांगत होते.
कामाचा प्रचंड उरक, धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि झोकून देऊन काम मार्गी लावण्याची सवय यासाठी धनंजय मुंडे यांना ओळखले जाते. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला असतानाही त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर केवळ दोनच दिवस विश्रांती घेऊन आपल्या नियमित कामांना सुरुवात केली आहे.