मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आज मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधी गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक झालेली असून, सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. मलिक यांना यापूर्वी दिलेली कोठडी आज संपत असल्याने त्यांना सोमवारी पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ ने (सक्तवसुली संचालनालय) मलिक यांची २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ईडी’ कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आधी ४ एप्रिलपर्यंत व नंतर पुन्हा १८ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्याशी संबंधित १५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ‘ईडी’ कारवाई विरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मलिक यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.