सिल्व्हर ओकवरील आंदोलन : गुणरत्न सदावर्तेंना चिथावणीखोर वक्तव्य भोवले

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील किला कोर्टाने दोन दिवसांची म्हणजे ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर इतर १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या आणि आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हल्लाबोल करून चप्पल व दगडफेक केली. या हिंसक आंदोलनानंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. कालच्या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निषेध आंदोलन केले. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्यांना काल रात्री अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी १०९ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही अटक केली होती. या सर्वांना शनिवारी दुपारी मुंबईतील किला कोर्टात पोलिसांनी हजर केले. न्यायाधीश कैलास सावंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यावेळी सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर सदावर्ते यांच्या बाजूने तब्बल सात वकिलांची फौज उभी होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी हे हिंसक कृत्य केले आहे. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यात दोन पोलिस गंभीर जखमी झाले असून या प्रकरणाची अधिक चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते याचा तपास करायचा आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून या आंदोलनामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. यामागे नेमके कोणाचे डोके आहे याचा तपास करायचा आहे. प्रथमदर्शनी पोलिस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे आहेत. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली.
रॉयल स्टोन येथेदेखील आंदोलन होणार होते. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केली जाणार होती, अशी माहिती घरत यांनी कोर्टात दिली. यावर न्यायाधीशांनी इतक्या लोकांचा तपास १४ दिवसात शक्य आहे का? अशी विचारणा केली. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने महेश वासवानी यांनी युक्तिवाद केला. अॅड महेश वासवानी म्हणाले की, मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली. त्या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला आहे. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची.आज सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत. आम्ही मुंबईत आंदोलनाबाबत कुठेच नाही बोललो. आम्ही बारामतीत बोललोय आणि घुसून आंदोलन करा वगैरे आम्ही कुठेच बोललो नाही. घटनेवेळी सदावर्ते तिथे नव्हते. ते मॅट कोर्टात होते.

एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जो राडा घातला त्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सिल्व्हर ओकवरील हल्ल्याच्या आदल्या दिवशीच ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून त्यांना जाब विचारणार, असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. सदावर्तेंच्या या वक्तव्याने प्रेरीत होऊन आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. आंदोलक एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजताच पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पण पोलिस वेळेवर पोहोचू शकले नाही, असे पोलिस एफआयआरमध्ये उघड झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी काही जणांवर जबाबदारीदेखील दिली गेली होती. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ८ तारखेला दुपारी ३ वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण ७ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरीसुद्धा शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

Share