‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक

‘झी’ मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी प्रेमकथा हाताळण्यात आली. यश आणि नेहा आणि परी ही तीनही पात्रे चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. प्रार्थना बेहरे या मालिकेमध्ये नेहा हे पात्र साकारत असून, सध्या मालिकेत नेहा (प्रार्थना बेहरे) कामानिमित्त लंडनला जाताना दाखवली आहे. यामुळे पुढचे काही दिवस प्रार्थना या मालिकेत दिसणार नाही.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ‘परी’ ही भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकूळ हिचे विशेष कौतुक होत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे (नेहा) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (यश) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत, तर संकर्षण कऱ्हाडे हा यशच्या मित्राची भूमिका साकारत आहे. प्रार्थना बेहरे हिने याआधी बऱ्याच मालिका आणि चित्रपट केल्याने तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेला रामराम ठोकल्याची बातमी पसरली असून, यामुळे चाहते नाराज झाले आहेत; परंतु तिने ही मालिका सोडलेली नाही तर काही काळासाठी ती या मालिकेत दिसणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ‘नेहा’ म्हणजे प्रार्थना बेहरे कामानिमित्त लंडनला जाताना दाखवली आहे. यामुळे पुढचे काही दिवस प्रार्थना मालिकेत दिसणार नाही. प्रार्थना बेहरे या मालिकेतच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही लंडनवारी करत आहे. प्रार्थना पतीसमवेत सध्या लंडनमध्ये आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे. या मालिकेत नेहा, तर खऱ्या आयुष्यात प्रार्थना लंडनला गेल्यामुळे मालिकेत पुढचे काही दिवस ती दिसणार नाही. यामुळे सध्या प्रेक्षक आणि तिचे चाहते निराश झालेत. मात्र, प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपची झलक प्रेक्षकांसोबत शेअर करून, त्यांना अपडेट्स देत आहे. सध्या प्रार्थना, नवरा अभिषेकसोबत लंडन ट्रीपचा आनंद लुटतेय. दरम्यान तिने शेअर केलेल्या एक व्हिडीओत ती विमानाने प्रवास करताना दिसतेय.

लंडनवारीमागे हे आहे खास कारण
प्रार्थनाने तिच्या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत, ‘आम्ही लवकरच येतोय’ असे म्हटले आहे. सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये असून, पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे. लॉकडाऊन दरम्यान लग्नगाठ बांधलेल्या सोनालीच्या लग्नात कुणीही उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे निमित्त साधत ती पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात सात फेरे घेणार आहे. या लग्नसोहळ्यासाठीच प्रार्थना बेहरे लंडनला जात असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. सोनाली कुलकर्णी हिच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Share