बबली मोठी झाली नाही, अजूनही ती अल्लडच! किशोरी पेडणेकर यांचे खा. नवनीत राणांवर टीकास्त्र

मुंबई : नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्याची, आव्हान देण्याची लायकी नाही. बबली मोठी झाली नाही. अजूनही ती नासमझ आहे, असे म्हणत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

खा. नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: जनतेपुढे येऊन लढावं, महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी त्यांच्या विरोधात लढेल, तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असे आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यावरून शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांची थेट लायकी काढत त्यांना खडसावले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही; पण त्यांना अॅम्प्लिफायरकडून ही ऊर्जा मिळत आहे. लोकशाहीने अधिकार दिलेत म्हणून काहीही नका बोलू. तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्ही खासदार आहात त्याप्रमाणे तुमचे वर्तन असू द्या. आम्हाला वाटले होते की, बबली मोठी झाली; पण बबली मोठी नाही झाली. ती अजूनही अल्लड आहे. मागचा अॅप्लिफायर लावला जातोय आणि मग ती खाज वाढतेय. या खाजेवर आमच्याकडे औषध आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

नवनीत राणा यांच्या इशाऱ्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात. जाणूनबुजून या महाराष्ट्रात, मुंबईत दंगल परिस्थिती निर्माण करायची ही खाज आहे. याला हल्लाबोल म्हणत नाही. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातच नाही तर देशात त्यांच्या विशेष कामासाठी अव्वल क्रमांकावर आले, ती खरी पोटदुखी आहे. एकाची बेंबीदुखी आहे तर एकाची पोटदुखी आहे. एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा आहे. त्यांचा अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे. याचाच अर्थ ही खाज आहे. हा हल्लाबोल होऊ शकत नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील लोकांबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही. हे सगळं प्रसिद्धीसाठी आहे. आपण पाहिले की, गेल्या दोन दिवसांत नवनीत राणांना कोण जाऊन भेटले, ते सगळे अॅम्प्लिफायर आहेत आणि ही तिकडची ऊर्जा आहे; पण आम्हाला आम्हाला फरक पडत नाही. अशा आव्हानांमुळे शिवसेना अजून उजळून निघेल. असे भोंगे आणि सोंगे भाजपला लागणारच; पण आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Share