शरद पवारांना नाही; पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मी घाबरतो

मुंबई : “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के” या डायलॉगमुळे चर्चेत आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपण शरद पवारांना घाबरत नाही; पण ‘या’ दोन नेत्यांना घाबरतो. हे दोन नेते म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आहेत, असे आ. पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या नव्या सरकारने काल सोमवारी (४ जुलै) विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी जिंकली. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९७ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी जल्लोष केला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी पार पडल्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला शरद पवारांची भीती वाटत नाही; पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भीती वाटते, असे स्पष्टच सांगून टाकले.

विधानसभेत बहुमत चाचणीनंतर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आ. शहाजी पाटील यांच्या डायलॉगचा उल्लेख करत टोला लगावला. ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के करत बसले” असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्याचा दाखला देताना आ.शहाजी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजित पवार आणि शरद पवारांनी आपल्याला खूप प्रेम दिले. त्यांच्यासोबत आपण ३५ वर्षे राजकारण केले आहे. अजित दादा हे दादाच आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कायम चांगलेच बोलणार. मी कधी शरद पवारांना घाबरलो नाही; परंतु दोन व्यक्तींची मला जरुर भीती वाटते. यातील एक म्हणजे अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. या दोघांना तसे घाबरण्याचे कारण नाही; पण त्यांचा नैसर्गिकच दरारा वाटतो, असे आ शहाजी पाटील म्हणाले.

राज्यात गेल्या पंधरा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले. सुरुवातीला शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ४० आमदार नॉट रिचेबल होत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. या ठिकाणी रॅडिसन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. यावेळी आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरून बोलताना आ. शहाजी पाटील यांनी गुवाहाटीचा अनुभव शेअर करताना “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के” असे विधान केले होते. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने आ. पाटील यांच्या या डायलॉगची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या डायलॉगवर एक गाणेही तयार झाले. त्याला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिली.

Share