तब्बल २७ वर्षांनी सलमान खान आणि शाहरुख खान चित्रपटात दिसणार एकत्र

मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघे तब्बल २७ वर्षांनी एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याआधी हे दोन्ही सुपरस्टार १९९५ साली प्रदर्शित झालेल्या राकेश रोशन यांच्या ‘करण अर्जुन’ या सुपरहिट चित्रपटात एकत्र दिसले होते. आता लवकरच हे दोघे आदित्य चोप्रा यांच्या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

बऱ्याच दिवसांपासून सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या चाहत्यांना त्यांना चित्रपटात एकत्र पाहायचे आहे. यापूर्वी हे दोघेही ‘झिरो’ चित्रपटातील एका गाण्यात एकत्र दिसले होते. यानंतर दोघे ‘टायगर ३’ आणि ‘पठाण’ चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत; पण त्यांना एकत्रित असा कोणताही मोठा चित्रपट अजून मिळालेला नाही. अशात आता बातमी येत आहे की, हे मेगास्टार पुन्हा एकदा एक अ‍ॅक्शनपटात एकत्र येणार आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांचे पात्र ‘लार्जर दॅन लाईफ’ असणार आहे. या अ‍ॅक्शनपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहे.

चित्रपटाचे शूटिंग २०२३ च्या उत्तरार्धात किंवा २०२४ च्या सुरुवातीला सुरू होणार
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्रा गेल्या काही काळापासून या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले जात आहेत. या चित्रपटाचे शूटिंग २०२३ च्या उत्तरार्धात किंवा २०२४ च्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही एकत्र तारखा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या तारखाही या वर्षाच्या अखेरीस निश्चित केल्या जातील.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट
या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची अद्याप निवड झालेली नाही. ‘टायगर ३’ आणि ‘पठाण’ चा पहिला कट फायनल झाल्यानंतर या चित्रपटाची कथा शाहरुख खान आणि सलमान खान यांना सांगितली जाईल, असे मानले जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या दोन सुपरस्टारचा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे.

Share