शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला आज (२२ जून) ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मराठी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी कविता आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली होती. केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. तसेच त्यांना भ्रष्ट संबोधले होते. केतकीच्या या पोस्टनंतर महाराष्ट्रात चांगलेच वादंग निर्माण झाले होते. ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्नील नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पुण्यासह राज्याच्या विविध भागात २२ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे हिला १४ मे रोजी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. १८ मेपासून केतकी न्यायालयीन कोठडीत आहे.

कळवा पोलिस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल आहे. तत्काळ अटक आवश्यक नसलेल्या प्रकरणांत आरोपीला फौजदारी कायद्याच्या कलम ४१ ‘अ’ अन्वये आगाऊ नोटीस देणे बंधनकारक असतानाही पोलिसांनी ती दिली नाही. त्यामुळे माझ्या अटकेची कारवाईच बेकायदा आहे, असा दावा केतकीने या याचिकेत केला होता. केतकी चितळेवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तिच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली होती. पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाने सल्ला दिला होता. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.

दरम्यान, केतकी चितळे हिच्या जामिनाच्या याचिकेवर ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांच्यासमोर सुनावणी झाली. गुन्हे शाखेने आधीच केतकीच्या जामीन अर्जाला विरोध करीत उत्तर दाखल केले होते. मंगळवारी केतकीच्या जामीन अर्जाला पोलिस विरोध करीत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार बुधवारी (२२ जून) ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे.

Share