….तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार, मला खुर्चीचा मोह नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : बंडखोर आमदारांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावे की, मी मुख्यमंत्रिपदी नको आहे, त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नको आहे, त्यांनी मला सांगावे की, मी मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाही. मी राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवले आहे. मला कोणताही मोह नाही, मला सत्तेचा, खुर्चीचा मोह नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपली भूमिका मांडली.

शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी (२२ जून) सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या ४८ तासांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट करीत रोखठोक भाष्य केले. भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी निक्षून सांगितले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेल तर…

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. सत्तेच्या तडजोडीसाठी आपण सोबत आलो होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठीक आहे; पण मला दु:ख झाले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे. कमलनाथ आणि शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला; पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेल तर मग काय? मी त्यांना आपले मानतो, ते मला आपले मानतात की नाही माहीत नाही. ज्यांना मी मुख्यमंत्रिपदी नको आहे त्यांनी सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन तसे सांगावे. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रिपदी नको, मला तोंडावर सांगा, मी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, आज मी ‘वर्षा’ वरून माझा मुक्काम हलवतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. असे म्हणणाऱ्यांसाठी माझ्याकडे उत्तर आहे. शिवसैनिकांनी मला सांगावे की, मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी मुख्यमंत्रिपद आणि शिवसेना पक्षप्रमुखपद ही दोन्ही पदे सोडायला तयार आहे. त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसे नको. समोर या आणि सांगा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.

शिवसेना राजकारणातील जन्मदात्री
राजकारणातील जन्मदात्री शिवसेना आहे, तिच्यावर घाव घालू नका, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक गोष्ट सांगत व्यथा मांडली. ते म्हणाले, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे; पण त्यामागची गोष्ट कोणाला माहिती नाही. ती गोष्ट अशी आहे की, एकदा एका जंगलात लाकूडतोड्या झाड तोडत होता. कुऱ्हाडीचे घाव घालत असताना तिथे राहणारे पक्षी कासावीस झाले; पण घाव घातले जात असताना झाडाला किती वेदना होत असतील. म्हणून ते पक्षी झाडासोबत बोलू लागले. पक्ष्यांनी, दादा खूप दुखत असेल ना? वेदना होत असतील ना? असे विचारले. त्यावर झाडाने मला वेदना आणि दु:ख घाव होत आहेत याचे नाही तर हा लाकूडतोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालत आहे त्याचे लाकूड माझ्या फांदीचे आहे याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चालले आहे, अशी व्यथा उद्धव ठाकरे यांनी मांडली.

मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवतो  
राजकारणातील जन्मदात्री शिवसेनेवर तिचेच लाकूड वापरून कोणी घाव घालू नका. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो, हा अगतिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरे जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही. मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पूर्ण करणारच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जे काही मिळाले ते शिवसेनेमुळे हे लक्षात ठेवा  

अलीकडच्या काळात अनेकजण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना राहिली नाही, अशी टीका सातत्याने करत असतात; पण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील आणि आताच्या शिवसेनेत नेमका काय फरक आहे, हे मला सांगावे. २०१२ साली बाळासाहेब ठाकरे गेले. त्यानंतर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीत एकट्याने लढून ६३ जागा जिंकल्या. त्यानंतर अनेकजण मंत्री झाले; पण आता अनेकजण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हवी, असे म्हणत आहेत; पण मधल्या काळात तुम्हाला जी मंत्रिपदे मिळाली होती, ती बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली होती, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना खडसावले.

शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत
शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफले गेले आहेत, ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी निक्षून सांगितले. हिंदुत्वासाठी कोणी काय केले हे सांगण्याची ही वेळ नव्हे. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधिमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल. आपण आमदारांना भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या मुद्द्याचाही त्यांनी प्रतिवाद केला. मुख्यमंत्री भेटत नाही, असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीची परिस्थिती बोलाल, तर हे सत्य होते. त्यावेळी माझी शस्त्रक्रिया झाली होती. ते दोन-तीन महिने विचित्र होते. मी कोणालाही भेटू शकत नव्हतो. तेव्हा मुख्यमंत्री भेटत नव्हते हे बोलणे योग्य होते; पण आता मी सगळ्यांना भेटायला सुरुवात केली आहे. त्यानंतर माझे काम व्यवस्थित सुरू आहे. मी मुख्यमंत्रिपदी बसलो तेव्हा नवखा होतो, मला कोणताही अनुभव नव्हता; परंतु मी जिद्दीच्या जोरावर परिस्थिती सांभाळली, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बंडखोरांनी समोर येऊन सांगावे, तुम्ही आम्हाला नको आहात, मी पद सोडायला तयार
शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका. मला कोविड झालाय, मी राजीनामा देतो, तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे? शिवसैनिक सोबत आहेत तोवर मी कुठल्याही आव्हानाला सामोरे जाईन. शिवसैनिकांना वाटत असेल तर मी पक्षप्रमुख पददेखील सोडायला तयार आहे. एकदा ठरवू या. समोर या. आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई म्हणजे पद नाही. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंबप्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई आहे. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या हा विषय गौण आहे. संख्या कशी जमवता हे नगण्य आहे. मी आपला मानतो, त्यांनी मला समोर येऊन सांगायला हवे होते की, उद्धवजी, कारभार करायला नालायक आहात. हे त्या सध्या गायब असलेल्या आमदारांपैकी एका आमदाराने समोर येऊन सांगावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी नकोत तर मी आता फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर ‘वर्षा’ निवासस्थान सोडून जाईन. जोपर्यंत मी खुर्ची अडवून ठेवली आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. एकदा या, फोनवरून सांगा, फेसबुक लाईव्ह पाहिले, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. आम्हाला तिकडे यायला संकोच वाटतो. तुम्ही आम्हाला नको आहात हे सांगा, मी पद सोडायला तयार आहे.

सत्ता नसताना आव्हाने पेलली, आपण परत शिवसैनिकांच्या बळावर लढूया!
उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी गहिवरल्या आवाजात थेट शिवसैनिकांना साद घातली. सगळे सोडून गेले तरी शिवसैनिकांच्या बळावर लढूया, सत्ता नव्हती तेव्हादेखील आपण लढलो आहोत. अनेक आव्हाने पेलली आहेत. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेला शिवसैनिक आहे तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंचे आवाहन
बांधवांनो आणि भगिनींनी एकच सांगेन, पदं येत असतात, पदं जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. पदावर बसल्यानंतर अडीच वर्षामध्ये तुमची-माझी भेट झाली. मी फेसबुक लाईव्हवरून बोलतो त्यावेळी तुम्ही कुटुंबातले सदस्य असल्यासारखे सांगता. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. मुख्यमंत्रिपद ही आयुष्याची कमाई नाही. मुख्यमंत्रिपद माझ्याकडे अनपेक्षितपणे आले. शरद पवार यांच्या आग्रहास्तव मी हे पद स्वीकारले. हे माझे अजिबात नाटक नाही. संख्या किती कुणाकडे आहे हा विषय गौण आहे. लोकशाहीत संख्या अधिक कुणाकडे असते तो जिंकतो. ती संख्या कशी जमवता प्रेमाने जमवता, जोर जबरदस्तीने जमवता त्यानंतर अविश्वास ठराव मंजूर होतो. माझ्यावर अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ नये. मी माझे मन घट्ट करून बसलेलो आहे. मुख्यमंत्रिपदी राहायची अजिबात इच्छा नाही. माझ्याविरुद्ध एकाने जरी अविश्वास व्यक्त केला तर त्याने मला वैयक्तिक सांगावे, मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. एकच सांगतो, मी तुम्हाला भेटेन त्यावेळी माझ्यावर असेच प्रेम कायम ठेवा, असे उद्धव ठाकरे शेवटी म्हणाले.

Share