मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंपच आला. शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विविध प्रकारचे आरोप आणि टीका केली होती. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, खा.संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला औरंगाबाद (पश्चिम) मतदारसंघाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बंडखोर महिला आमदारांना वेश्या म्हणणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील, अशी टीका आ. शिरसाट यांची केली आहे.
“बंडखोरांनो, तुम्ही विकले आहात, त्यापेक्षा कामाठीपुऱ्यात पाटी लावून उभं राहा”, अशा आशयाचे विधान खा. संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या याच विधानाचा समाचार आ.संजय शिरसाट यांनी घेतला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. संजय शिरसाट यांनी म्हटले की, हे मूर्ख लोक अशा प्रकारचे वक्तव्य कसे करतात? याचेच आम्हाला वाईट वाटते. अशी टीका करण्याचा त्यांना अधिकार काय आहे. त्यांच्यापेक्षा फार कडवट आम्ही बोलू शकतो; पण यांना लाज वाटली पाहिजे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये ४ महिला आमदार होत्या. असे असताना त्यांनी आम्हाला वेश्या म्हटले.
संजय राऊतांना उद्देशून बोलताना आ. शिरसाट म्हणाले, बंडखोरी करणाऱ्यांमध्ये तुझी बहीण किंवा आई असती, तर तू असा बोलला असता का? बंडखोर महिलांना वेश्या म्हणणाऱ्यांना एकेदिवशी लोक जोड्याने मारतील. या आमदार महिला कुणाची तरी बायको, कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी लेक आहे. त्यांना वेश्या म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र सहन करेन का? असा सवालही आ. शिरसाट यांनी विचारला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर बंडखोर महिला आमदार रडल्याचेही त्यांनी सांगितले. हीच शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे का? एक दिवस येईल, आता त्यांना त्यांची लायकी कळेल, असेही आ. शिरसाट म्हणाले.