ठाणे मनपा निवडणुकीत वंचितकडून महिलांना प्राधान्य

ठाणे : आगमी ठाणे महापालिकेच्या निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल भगत, शहराध्यक्ष महेंद्र अनभोरे यांनी दिली. तसेच या निवडणुकीमध्ये वंचित कडून महिलांना सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ठाणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया कांबळे, महासचिव जयवंत बैले, युवा आघाडीचे संतोष कोरके, रेखा कुरवरे, मोहन नाईक, अशोक अहिरे आदी उपस्थित होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगली मते घेतले आहेत. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मनोदय आहे. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी पूर्ण झाली आहे. वंचित समाजघटकातील महिलांना सर्वाधिक संधी देऊन त्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. या आदेशांचे पालन करण्यात येईल. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या विषयांवर वंचित बहुजन आघाडी जनतेसमोर जाणार आहे. असं सुनील भगत यांनी सांगितलं.
मनसेकडून आघाडीचा प्रस्ताव आला नाही.

मनसेने ठाणे विकास आघाडीचा प्रस्ताव दिला आहे का, याबाबत विचारले असता, अद्याप तसा कोणताही प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे आलेला नाही. मात्र, तसा प्रस्ताव आला तरी वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेच त्याबाबत निर्णय घेतील, असेही भगत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुप मित्रा यांच्यासह संदीप खरात, उमेश दुबे, पंडागळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाणे शहराची ४७ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

त्यांचा विचारही वंचित करीत नाही
शहराध्यक्षांवर ठेकेदारीचा आरोप करीत काहीजणांनी पक्ष सोडला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अध्यक्ष हे ठेकेदार आहेत, यामध्ये दुमत नाही पण, ते आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांची दखलही पक्ष घेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या टीकेला आम्ही महत्वच देत नाही, असेही सुनील भगत यांनी यावेळी सांगितले.
Share