राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांनंतर फारुख अब्दुल्लांचीही माघार

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनण्यास नकार दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे नाव सुचवले होते. मात्र, आता फारुख अब्दुल्ला यांनीही माझी जम्मू काश्मीरला जास्त गरज असल्याचे सांगत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असून, विरोधकांकडून मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव आघाडीवर होते; पण आपल्याला अद्याप सक्रिय राजकारण करायचे असल्याचे सांगत पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीही आपल्याला सक्रिय राजकारण करायचे असल्याचे कारण सांगत माघार घेतली आहे.

फारुख अब्दुल्ला म्हणाले, जम्मू-काश्मीर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता आहे. जम्मू-काश्मीर आणि देशाची सेवा करण्यात सकारात्मक योगदान देण्यासाठी मी सज्ज असून, मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माझे नाव मागे घेत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी माझे नाव पुढे केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच ज्या नेत्यांनी पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे त्यांचेदेखील मी आभार मानतो.

टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून विरोधी पक्षाकडून सर्वांना मान्य असेल अशा व्यक्तीच्या नावाचा विचार केला जात होता. त्यानंतर बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव समोर आले. मात्र, पवारांनी राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) एन. के. प्रेमचंद्रन यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांची नावे विरोधी पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून सुचवली गेली. मात्र, शरद पवार यांच्यापाठोपाठ फारुख अब्दुल्ला यांनी नकार दिल्यानंतर विरोधी पक्षांकडे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर पुन्हा विचारविनिमय करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव घेतले जात आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ५,४३,२१६ मतांची गरज
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार शोधण्याबरोबरच, एनडीएशी स्पर्धा करण्यासाठी विरोधकांना लक्षणीय मते मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित पाहिले तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान ५,४३,२१६ मतांची आवश्यकता असेल. लोकसभेच्या ५४३ आणि राज्यसभेच्या २३३ सदस्यांच्या मतांचे मूल्य ५,४३, २०० आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य ५,५४३२३१ इतके आहे. म्हणजेच संसद सदस्य आणि सर्व विधानसभेतील सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य १०८६४३१ आहे. देशाच्या सध्याच्या राजकारणात एनडीए आणि यूपीए या दोनच आघाड्या अस्तित्वात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, एनडीएकडे सुमारे ४८ टक्के मते आहेत आणि त्यांच्या उमेदवाराला विजयासाठी १० हजारांहून अधिक मतांची आवश्यकता आहे, तर यूपीएकडे जवळपास २३ टक्के मते आहेत. संयुक्त विरोधी पक्षाचे बोलायचे झाले तर त्यांच्याकडे ५१ टक्के मते आहेत.

Share