राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल; पायावर होणार शस्त्रक्रिया

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते. अखेर या शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाली आहे.

दोन महिने राज ठाकरेंना विश्रांतीचा सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सुमारे दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरून सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती.

टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.

Share