उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर १०० फूट दरीत कोसळली; औरंगाबादच्या डाॅ. अलका एकबोटे ठार

औरंगाबाद : उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री महामार्गावर कोपांग गावाजवळ रविवारी मध्यरात्री दीड वाजता एक टेम्पो ट्रॅव्हलर १०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डाॅ. अलका व्यंकटेश एकबोटे (वय ४५ वर्षे) आणि माधवन यांचा समावेश आहे. या अपघातात एकूण १५ जण जखमी असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी बहुतांश लोक औरंगाबादचे आहेत.

औरंगाबाद शहरातील १५ डाॅक्टर कुटुंबीय उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी शनिवारी उत्तराखंडला निघाले होते. हे सर्वजण टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करीत होते. उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री महामार्गावर कोपांग गावाजवळ रविवारी (२९ मे) मध्यरात्री दीड वाजता आधीच अरुंद असलेल्या, निमुळत्या रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरचे ब्रेक फेल झाले. चालकाने खूप प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. टेम्पो ट्रॅव्हलर १०० फूट दरीत कोसळली. त्यात औरंगाबादेतील कमलनयन बजाज हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डाॅ. अलका व्यंकटेश एकबोटे (वय ४५ वर्षे) यांचे जागीच निधन झाले. त्यांचे पती डॉ. व्यंकटेश एकबोटे, मुलगा अर्णव एकबोटे (वय १३ वर्षे), आयरा एकबोटे (वय १० वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

औरंगाबाद येथील स्माइल केअर हाॅस्पिटलच्या दंतरोगतज्ज्ञ डाॅ. उमा पाटील-महाजन, त्यांचे पती डाॅ. प्रणव महाजन, त्यांची मुलगी अनया महाजन (वय ९ वर्षे) व डाॅ. उमा पाटील-महाजन यांची बहीण वृषाली पाटील हे एकबोटे परिवारासोबत होते. या अपघातात डाॅ. उमा पाटील-महाजन यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांची मुलगी अनयाला काहीही झाले नाही. डाॅ. उमा यांच्या भगिनी वृषाली पाटील गंभीर जखमी असून, त्या व्हेंटिलेटरवर आहेत. डाॅ. प्रणव महाजन व इतर काहीजण दुसऱ्या गाडीत होते. त्यामुळे ते बचावले.

एमजीमएच्या प्रसूतितज्ज्ञ डॉ. अनुप्रिया महर्षी (वय ४२ वर्षे) जखमी झाल्या आहेत. त्यांच्या खांद्याला मार लागला असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. डॉ. अनुप्रिया यांचा मुलगा अर्णव (वय १४ वर्षे) याच्या डोक्याला दुखापत झाली. तो गंभीर असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साक्षी शिंदे, अर्चना शिंदे, सई पवार, सुभाष सिंह राणा, रजनीश सेठी, जितेंद्र सिंह अशी इतर जखमींची नावे आहेत. हा अपघात एवढा गंभीर होता की, कोपांग येथे तैनात असलेल्या आयटीबीपीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. सर्व जखमींना लष्कराच्या हर्षिल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच प्राथमिक उपचार करून काही प्रवाशांना उत्तर काशीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या भगिनी डॉ. उज्ज्वला दहिफळे यांना या अपघाताची माहिती कळताच त्यांनी चंदीगडमध्ये डॉ. कराड यांच्याशी संपर्क साधला. मंत्री डाॅ. कराड यांनी तातडीने डेहराडूनच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून सूत्रे हलवली. डाॅ. अलका यांचा मृतदेह औरंगाबादेत आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्यासाठी डाॅ. कराड यांनी मदत केली.

या अपघातात मरण पावलेल्या डॉ. अलका एकबोटे या एम. डी. पेडियाट्रिक्स होत्या. त्यांनी फेलो माॅलिक्युलर अँड जेनेटिक्सचे वेल्लोर येथे शिक्षण घेतले होते. औरंगाबादेतील कमलनयन बजाज हाॅस्पिटलमध्ये त्या कार्यरत होत्या. जनुकीय आजारांवर त्या उपचार करत. गर्भाशयातच बाळांना आजाराची लक्षणे दिसल्यास आणि नवजात शिशूमध्ये जेनेटिक्सच्या समस्या सोडवण्यात त्या निष्णात होत्या. डॉ. अलका एकबोटे यांचे पती डॉ. व्यंकटेश एकबोटे हे कमलनयन बजाज हाॅस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉ. अलका एकबोटे यांच्या अपघाती निधनाबद्दल औरंगाबादेतील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतात दु:ख व्यक्त केले जात आहे.
डॉ. अलका एकबोटे यांच्या निधनाने मोठे नुकसान झाल्याचे बजाज हॉस्पिटलचे प्रमुख सी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले.

Share