राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला ‘चलो अयोध्या महाअभियान’ आयोजित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान सहन केला जाणार नाही, ५ जूनला अयोध्येला जायचं असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चलो अयोध्या महाअभियानाला पोस्टर्स लावून पाठिंबा देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. अयोध्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी नियोजनात काटेकोरपणा आणला जात आहे. तसंच मनसेचं एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे सुमारे १० ते १२ रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश भाजप खासदाराचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत असल्याने आता मनसे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share