मुंबई : मागील नऊ दिवस चाललेल्या सत्तानाट्यावर अखेर काल रात्री पडदा पडला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशभरातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर खोचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
आपल्या बंधूंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असणार? ते काय बोलणार? ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी १५ तासांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो”, असे राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये कुठेही उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर टीकेला बाण सोडला आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांचे आणखी एक ट्विट चर्चेत आले आहे. १० मे रोजी राज ठाकरे यांनी एक पत्र ट्विट केले होते. त्यावेळी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरून राज ठाकरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. ”राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे राज यांनी पत्राच्या शेवटी म्हटले होते. राज ठाकरेंनी दीड महिन्यांपूर्वी केलेल्या या ट्विटची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.