१४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार : खा. नवनीत राणा

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. हनुमान चालीसा पठण करणं आणि प्रमु श्रीरामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर १४ दिवस नाही तर १४ वर्ष तुरुगांत राहण्यास तयार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे. तुरुंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसात ही महिला दबली जाणार नाही. आमची लढाई देवाच्या नावाची आहे. मी ही लढाई पुढेही लढत राहील, असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

नवनीत राणा यांचे रुग्णालयाबाहेर स्वागत 

नवनीत राणा रुग्णालयाबाहेर येताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांना कार्यकर्त्यांकडून भगवी शाल देण्यात आली. तसंच हनुमानाची एक मूर्ती देण्यात आली. नवनीत राणा यांच्या स्वागता दरम्यान कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांकडून शंखनाद देखील करण्यात आला.

Share